- दोघांची कंपनीतील कॅन्टीन व्यवस्थापक व मालकाला धमकी; खंडणीचीही मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- एचपीसीएल कंपनीतील कॅन्टीनमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या इसमाकडे सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दोघेजण आले. त्यांनी कॅन्टीन संदर्भात बोलायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांना कंपनीसमोर नेले. तिथे एका कारमध्ये (एम एच १४ / जे पी ५६६६) बसून त्यांना ‘तू तुझा सर्व स्टाफ घेऊन निघून जायचे. तू कॅन्टीन चालू ठेवले तर तुला गोळ्या घालीन’ अशी धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी यांच्यासमोर त्यांच्या कॅन्टीनच्या मालकाला आरोपींनी फोन केला. ‘१५ मिनिटाच्या आत तू कंपनीला लेटर देऊन तू कंपनी सोडायची. नाहीतर तुझ्या माणसाला ठार मारीन’, अशी आरोपींनी फिर्यादी यांच्या कॅन्टीनच्या मालकाला धमकी दिली. ‘ या अगोदरचे कॉन्ट्रॅक्टर मला दर महिन्याला २५ हजार रुपये देत होते. तू मला महिन्याला २५ हजार रुपये दे’ असे म्हणत आरोपींनी खंडणी मागितली.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी अपहरण केलेल्या फिर्यादी यांना सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांकडे कारचा नंबर होता. आरोपी त्यांच्या कारमधून तळेगाव चौक, चाकण येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकात सापळा लावून २० लाखांच्या कारसह दोघांना ताब्यात घेतले. शिवाजी नरसू पाटील (वय ५६, रा. महाळुंगे ता. खेड) असे अपहरण आणि सुटका झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहूल राजाराम कान्हूरकर (वय २६), अक्षय विनय खलाटे (वय २४, दोघे रा. बहुळ, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.












