- पालिका पंधरा कोटीपेक्षा अधिक खर्चून रॅम्पची उभारणी करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या चिंचवडगावात उतरणा-या रॅम्पमुळे नागरिकांचे १.५ किलोमीटर अंतर वाचणार असून त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत देखील होणार आहे. तसेच शहरातील वाहतुक कोंडी कमी होणार असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपूलावरुन चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी दोन्ही बाजूस रॅम्प बांधण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य शैलेश मोरे, शितल शिंदे, जयश्री गावडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या या रॅम्प बाबत नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती त्या अनुषंगाने या रॅम्पचा शुभारंभ आज होत आहे. या रॅम्पचा उपयोग चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी तसेच नागरिकांना होणार आहे असे सांगून या भागालगतची वाहतुक निश्चितच सुरळीत होणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाजवळील प्रस्तावित पुलाची लांबी १४१.४७ मीटर असून या पूलासाठी १५ कोटी ७९ लाख इतका खर्च येणार आहे. पुलाचे कामकाज १८ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली.












