- १६ सप्टेंबरची डेडलाईन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- पीएमआरडीएच्या विकास आराखड्यावर आतापर्यंत २६ हजार हरकती व सूचना आल्या आहेत. दरम्यान, विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना मागविण्याची मुदत पंधरा दिवस वाढविण्यात आली असून १६ सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या त्यांच्या हरकती व सूचना दाखल कराव्यात असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी केले आहे.
पीएमआरडीएने महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या २३ गावांसह संपुर्ण पीएमआरडीए क्षेत्राचा विकास आराखडा २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. हरकती आणि सूचनांसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतू, पीएमआरडीएचे क्षेत्र हजारो कि.मी. असल्याने व अनेक गावांचा त्यामध्ये समावेश असल्याने हरकती आणि सूचनांसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत होती.
त्यानुसार १५ दिवस आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत अर्थात १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत नागरिकांनी अधिकाअधिक हरकती नोंदवाव्यात असे आवाहन दिवसे यांनी केले आहे.
दिवसे यांनी सांगितले, की पीएमआरडीए हद्दीतील ८१४ गावांचे ६ हजार ९०० चौ.कि.मी.क्षेत्र आहे. यावर आतापर्यंत २६ हजार हरकती व सूचना आल्या आहेत. यापैकी एकही हरकतीची पुनरावृत्ती करण्यात आलेली नाही. काही नागरिकांनी तहसील कार्यालयात, पीएमआरडीए कार्यालयात येउन हरकती नोंदविल्या असून काहींनी ऑनलाईन हरकती नोंदविल्या आहेत.












