- ‘घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धे’तील विजेत्याला मेडिक्लेम विमा पॉलिसी..
- कोरोना काळात कुटुंबाचे संरक्षण; मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागाचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र तयारी होत असतानाच चिखली मोरेवस्ती प्रभाग १ मधील नवदुर्गा सखी मंच आणि पांडाभाऊ साने युवा मंच ‘घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१’ च्या निमित्ताने भक्तांचा उत्साह द्विगुणीत करीत आहे. घराघरांतील श्रीगणेश व गौरी यांच्यासाठीची आरास काही निवडक भाग्यवंताना कोविडपासून मुक्तता मिळवून देण्यात महत्वाची जबाबदारी पार पडणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान १० ते १९ सप्टेंबर २०२१ दरम्यान घरोघरी तयार केलेल्या गणेश व गौरी सजावटीसाठी ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील गौरी व गणपती विजेत्याना प्रथम, द्वितीय, तृतीय अशा एकूण सहा बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना स्पर्धेचे आयोजक पांडाभाऊ साने म्हणाले, गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा हळवा कोपरा. अतिशय श्रद्धा आणि मोठ्या भक्तिभावाने हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. बाप्पांच्या आगमनापूर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येक जण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. घरगुती गणपतींना होणारी सजावट लक्षात घेता आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती गणेशोत्सव व गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा सुस्पष्ट फोटो व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. त्यानंतर आमचे परीक्षक स्पर्धेतील सहभागी भक्तांच्या घरी जाऊन सजावटीची पाहणी करतील. आकर्षक सजावटी असणाऱ्या भाग्यवंतांचा सन्मान करण्यात येईल. कोरोनाच्या अनुषंगाने विजेत्या कुटुंबाचा पाच, तीन व एक लाखांचा कॅशलेस मेडिक्लेम विमा उतरविण्यात येणार आहे. त्यामुळे इतर आजारांसोबतच कोरोना आजाराच्या खर्चापासूनही त्यांना संरक्षण मिळेल.
स्पर्धेचे नियम व अटी :-
१. स्पर्धकांनी आपल्या सजावटीसोबत स्वतःचा सुस्पष्ट फोटो व नाव ८००३९२९०९० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा.
२. स्पर्धकांनी स्वतःचे पुर्ण नाव, पत्ता, आधारकार्ड, पॅनकार्ड पांडाभाऊ साने यांच्या जनसंपर्क कार्यालयात जमा करावे.
३. स्पर्धेचा निकाल हा अनंत चतुर्दशी दिवशी जाहीर केला जाईल
४. अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६४६४२०८४ / ९८२३६०६०१८.