न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १४ जाने.) :- मुंबई-पुणे महामागार्वरील निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलावर कर्नाटकची पासिंग असलेला (के ए ३२ / सी ६३८१) एक मालवाहू ट्रक आज सोमवार (दि. १४) रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुलाच्या कठड्यास धडकून पलटी झाला होता. उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली आहे.

ट्रकची पुढची दोन्ही चाके निखळली होती. त्यामुळे ट्रक बाजूला करण्यासाठी व त्यातील माल हटवण्यासाठी मोठी क्रेन घटनास्थळी दाखल झाली व ट्रकमधील माल बाहेर काढण्यात आला आहे. प्रसंगावधान साधून चालकाने चालू ट्रक मधून बाहेर उडी घेतली. कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी, काही काळापुरती या पुलावर वाहतूक कोंडी मात्र झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.











