- कुठल्याही क्षणी या अध्यक्षांना एसीबीचे आवतनं?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय्य सहाय्यकांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी एसीबीने स्थायीतील पंधरा जणांची चौकशी सुरू आहे. तर, तक्रारदाराचे प्रकरण हे २०१७-२०१८ पासून प्रलंबित होते. तेव्हापासून एसीबीने चौकशी करण्यास सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या कालखंडातील स्थायी समिती अध्यक्षांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
जाहिरात होर्डिंग्ज लावण्याच्या मंजूर ठेक्याची वर्कऑर्डर देण्यासाठी लाच मागितली जात असल्याची तक्रार फुगेवाडीतील ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. हे प्रकरण २०१७-२०१८ पासून निर्णयाविना प्रलंबित होते. म्हणूनच एसीबीने तक्रारदाराशी संबंधित २०१८ पासूनची सर्व कागदपत्रे ताब्यात घेली आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मडिगेरी, संतोष लोंढे हे स्थायीचे अध्यक्ष झाले आहेत. तक्रार कालखंडातील माजी अध्यक्षांची कधीही चौकशी होऊ शकते, असेही एसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
मागील आठवड्यात महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी नोटीस बजावली होती. स्थायी समितीत भाजपचे नऊ , राष्ट्रवादी काँग्रेसचे चार , शिवसेना एक आणि भाजप सलग्न एक अशा पंधरा सदस्यांचा समावेश आहे. त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. त्यापैकी १२ जणांनी आपले म्हणणे मांडले आहे.