- कॉंग्रेसच्या एक प्रभाग दोन नगरसेवक मागणीला मुख्यमंत्र्यांकडून नकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन नगरसेवक एक प्रभाग अशीच पद्धत राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे दोन सदस्य प्रभाग पद्धत करण्याची काँग्रेसची मागणी मान्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होईल.
मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीत महापालिकांमध्ये तीन सदस्य एक प्रभाग, नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये दोन सदस्यांचा एक प्रभाग तसेच नगरपंचायतीमध्ये एक सदस्य एक प्रभाग पद्धत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापालिकांमध्ये दोन सदस्यांचा एक प्रभाग करावा, अशी मागणी आम्ही मंत्रिमंडळात केल्याचे सांगितले होते.
प्रदेश काँग्रेसच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत दोन सदस्यांचा एक प्रभाग करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. चार सदस्यांचा एक प्रभाग करावा किंवा दोन सदस्यांचा एक प्रभाग करावा, अशा मागण्या झालेल्या होत्या. त्यातून मध्यम मार्ग काढत तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. तो कायम राहील, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर कोणीही टोकाची भूमिका घेतली नाही.