- आदित्य ठाकरे यांची शहरातील कायनेटिक आणि टाटा मोटर्सला भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२१) :- राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कायनेटिक मोटर्स आणि टाटा मोटर्सला भेट दिली. राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रीक व्हेकल घ्याव्यात यासाठी महाराष्ट्रातील ठराविक कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचं आदित्य यांनी सांगितलं आहे. त्यामधीलच ही भेट असल्याचं ते म्हणाले.
ही व्हेकल मार्केटमध्ये आल्यानंतर किती लोकांना प्रोत्साहित करू शकेल? किती लोक घेऊ शकतील याबद्दल चर्चा झाल्याचं ते म्हणाले. प्रदूषण खूप वाढत असल्याने इलेक्ट्रीक व्हेकलला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचं आदित्य यांनी सांगितलं आहे. या कंपन्यांसोबत चर्चा करुन जास्तीत जास्त इलेक्ट्रीक गाड्या लोकांना विकत घेता येण्यासंदर्भात सरकार आणि या कंपन्यांमध्ये काही ठोस करार होऊ शकतात.
दिल्लीमध्ये यापूर्वीच असे इलेक्ट्रीक व्हेइकल धोरण लागू करण्यात आलं आहे. या धोरणामध्ये इलेक्ट्रीक गाड्या घेणाऱ्यांना अनुदान दिलं जातं आहे. असाच निर्णय महाराष्ट्रातही घेतला जाऊ शकतो अशी चर्चा सुरु आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया संबंधित खात्यांकडून नोंदवण्यात आलेली नाही.