- पालिका आयुक्त राजेश पाटील यांचा स्पष्ट इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- प्रकल्प सल्लागारांकडून अंदाजपत्रक फुगविणे, योग्य कारणाशिवाय मुदतवाढ घेणे, अनावश्यक भाववाढ फरक, कामात दर्जा व गुणवत्ता न राखणे आदी बाबी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. यापुढील काळात या बाबी पुन्हा निदर्शनास आल्यास संबंधितांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल किंवा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या विविध विभागांकडून विकास कामांसाठी प्रकल्प सल्लागारांची नेमणूक केली जाते. प्रकल्प सल्लागारांच्या कामकाजात प्रामुख्याने स्थळ पाहणी करून प्रकल्प आराखडा तयार केला जातो. विविध विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्राला मंजुरी घेतली जाते. नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्यात येतात. प्रकल्पांचे सादरीकरण केले जाते. निविदेबाबतचे कामकाज करण्यात येते. विविध विभागांशी समन्वय साधला जातो. ठेकेदाराच्या कामावर निगराणी ठेवली जाते. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यात येतो. जोते तपासणी व पुर्णत्वाचा दाखला मिळविणे आदी कामांचा त्यामध्ये समावेश होतो.
प्रकल्पाचे काम चालू असताना प्रकल्प सल्लागारामार्फत अंदाजपत्रक फुगविण्यात येते. विशेष / योग्य कारणाशिवाय मुदतवाढ घेतली जाते. त्यामुळे अनावश्यक भाववाढ फरक निर्माण होतो. कामाचा दर्जा व गुणवत्ता राखली जात नाही. या बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यानुसार, आयुक्तांनी याबाबत परिपत्रक काढून सर्व विभागप्रमुखांना याबाबत सूचना दिल्या आहेत.