- शहर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली ७ अधिकाऱ्यांची समिती; आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी शहर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली ७ अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. एक कोटी रकमेपेक्षा अधिक खर्चाच्या सर्व निविदा स्थायी समितीकडे पाठविण्यापूर्वी समितीची पूर्वपरवानगी लागणार आहे. शहर अभियंता राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे.
त्यात मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, दक्षता व नियंत्रणचे कार्यकारी अभियंता पोरेड्डी, कायदा सल्लागार तथा उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप हे सदस्य आहेत. तर, संबंधित विभागाचे प्रमुख सदस्य सचिव असणार आहेत.
निविदेतील अटी – शर्ती यांच्या कायद्यातील तरतूदी तपासणी करणे. त्याचप्रमाणे ज्या निविदेमध्ये एक कोटी पुढील रकमांचा देखील अंतिम समावेश असतो अशा निविदा मंजुरीकामी संबंधित विभागप्रमुख, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्या मान्यतेने समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतात. अशी निविदा प्रक्रिया पार पाडताना निविदा प्रक्रियेतील अनेक त्रुटी आढळून येतात. त्या त्रुटी दूर करून तपासणी होण्यासाठी शहर अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती गठीत केली आहे. यापुढे विभागप्रमुखांनी एक कोटी रुपयांच्या रकमेवरील सर्व निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यापूर्वी या समितीची पूर्वमान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांच्या मान्यतेने विषयपत्र स्थायी समितीकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निविदा प्रक्रियेतील व सुचनांचे पालन करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे, असे आयुक्त पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.
















