- शुद्ध, आल्हाददायक वातावरण राखण्यात मदत; सत्ताधाऱ्यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड व पुणे शहरासाठी पीएमपीएमएलकडून संयुक्तरित्या एक हजाराहून अधिक बस खरेदी केल्या जाणार आहेत. मात्र, पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप स्वतंत्रपणे इलेक्ट्रिकच्या ५० मिनी बसेस खरेदी करणार आहे. तसा ऐनवेळचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत बुधवारी (दि. ६) मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
पिंपरी – चिंचवड शहरामध्ये पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, थेरगाव, रहाटणी अशा विविध परिसरात गावठाण भाग आहे. गावठाणातील रस्ते अरुंद आहेत. या अरुंद रस्त्यावर नेहमीच गर्दी होते. या रस्त्यावर १२ मीटर लांबीच्या बसचे संचलन करता येत नाही. त्यामुळे त्यांना सुविधांपासून वंचित राहावे लागते. यासह औद्योगिक परिसर व कंपन्यांमुळे शहरात प्रदुषण पातळी वाढलेली आहे. ती कमी करण्यासाठी नवनीन उपाययोजना गरजेच्या आहेत.
शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प होत असताना नागरिकांना शुद्ध स्वच्छ आल्हाददायक वातावरण रहावे. या हेतूने शहरात इलेक्ट्रिक बस गरजेच्या आहेत. पालिकमार्फत ७ मीटर व ९ मीटर लांबीच्या मिनी बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, असा बस खरेदी प्रस्ताव समितीने मंजूर केला.
















