- बॉम्बशोधक पथक दाखल; कोल्हापूर शहरात खळबळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- कोल्हापुरातील देवस्थान अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आला आहे. या माहितीमुळे कोल्हापुर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन येताच कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाची धावपळ उडाली आहे. तात्काळ बॉम्बशोधक पथक अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहे. मंदिराच्या सर्व ठिकाणी बॉम्ब आहे का? याचा शोध घेतला जात आहे. असा फोन आल्याने मंदिरातील भाविकांचे दर्शन तात्काळ थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शेवटी हा काॅल खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
















