- मावळते अध्यक्ष सचिन साठे अखेर पदाच्या जबाबदारीतून मुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी वर्षभरापूर्वी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुर्पूद केला होता. पक्षश्रेष्ठीनी साठे यांचा राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे तेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहराचा कारभार हाकत होते. आता त्यांच्या रिक्त जागेवर कैलास कदम यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लावली आहे.
कदम यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्या पदावर काम केले आहे. ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. कॉंग्रेसने एका कामगार नेत्याला शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
















