- आयुक्तांसह ४ अधिकाऱ्यांची स्वतंत्र एसपीव्ही कंपनी; स्थायीची मोहोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलीटी (सीएसआर) विभागाला खासगी कंपन्यांकडून अधिक निधी मिळावा म्हणून त्या विभागासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ४ अधिकाऱ्यांची स्वतंत्र एसपीव्ही कंपनी स्थापन केली जाणार आहे. सभापती नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ६) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या या प्रस्तावाला मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यात आली आहे.
पालिकेच्या सीएसआर विभागास सध्या वस्तूरूपात वर्षाला एकूण ८ ते १० कोटी रूपयांचा निधी मिळत आहे. वस्तूरूपात मदत मिळत असल्याने महापालिकेच्या उपक्रम आणि योजनांसाठी खर्च करता येत नाही. विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी कायद्यानुसार स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचे आयुक्तांच्या सुचनेवरून प्रस्ताव दिला आहे. कंपनीची स्थापना झाल्यास सीएसआर विभागास दरवर्षी १५० ते १७५ कोटी निधी रोखीने महापालिकेस मिळतील, असा दावा विभागाने केला आहे.
त्या कंपनीचे अध्यक्ष आयुक्त राजेश पाटील असणार असून, संचालक मंडळात ४ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. सीएसआर कंपनीचा कंपनीकडे सोपविणे व महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रतिवर्षी १ कोटी रुपयांची तरतूद करून ती कंपनीकडे हस्तांतरीत करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तशी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.
















