- कोर्टाचे राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- इंद्रायणीनगर- धावडे वस्ती परिरातील सुमारे ५० हजार नागरिकांना पाणीपुरवठा करता यावा. या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या पाणीच्या टाकीचे काम प्रलंबित ठेवल्याप्रकरणी राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत पेठ क्रमांक १ प्लॉट क्रमांक ४ येथे १९३३.०३ या मोकळ्या जागेवर पाण्याची टाकी (जलकुंभ) उभारण्याचा प्रस्ताव क – प्रभाग समितीमध्ये दि. ५ नाव्हेंबर २०१८ रोजी (ठराव क्रमांक ३८) मंजुर केला आहे. महापालिका प्रशासनाने त्याबाबत कार्यादेशही दिला आहे. मात्र, राजकीय दबावापोटी आणि श्रेयवादातून संबंधित टाकीचे काम प्रलंबित ठेवले आहे, असा आक्षेप भाजपा नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी घेतला होता. दरम्यान, राजकीय संघर्षातूनच राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले होते.
वकील सिद्धार्थ रविंद्र रोंघे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पाण्याच्या टाकीचे काम का थांबवले? याची कारणमिमांसा करण्याची सूचनाही केली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वकीलांना बाजू मांडण्यासाठी पुढील तारखेस हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे.
















