- पिंपरीतील वल्लभनगर आगाराचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवडच्या आगारातून १० ऑक्टोबरपासून प्रत्येक रविवारी पुणे ते जुने महाबळेश्वर दर्शन बससेवा सुरु होणार आहे. पुणे ते जुने महाबळेश्वर, प्रतापगड दर्शन (भवानी माता मंदिर प्रतापगड) ही फेरी वल्लभनगर आगारातून सकाळी सहा वाजता सुटणार आहे.
शिवाजीनगर येथून सकाळी सव्वासहा वाजता पुणे स्टेशन येथून साडेसहा वाजता आणि स्वारगेट येथून पावणेसात वाजता सुटणार आहे. या बससेवा बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन प्रतापगड येथे पोहोचेल.
प्रतापगड दर्शन झाल्यानंतर परत येत असताना जुने महाबळेश्वर येथील मंदिर दर्शन करून परत पुण्याकडे मार्गस्थ होईल. या प्रवासासाठी ६६० रुपये भाडे असणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वल्लभनगर आगाराने केले आहे.