- पालिकेच्या वर्धापनदिनी पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता अभियान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त स्वच्छता अभियान सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर ऊषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील व पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.
११ ॲाक्टोबर रोजी महापालिका ३९ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त १२ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या नागरिकांनी आपल्या मिळकतीची नोंद केली नसेल त्यांना स्वयंमुल्यांकण व नोंदणीची सुविधा महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. या योजनेचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शहरात चार प्रभागांमध्ये इंदौर च्या धर्तीवर कचरा विलगीकरण व संकलन करण्यात येत असून त्याची व्याप्ती शहरात करण्यात येणार आहे. तसेच वर्धापनदिनिमित्त पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार असणाऱ्या नागरिकांचा गौरव ११ ॲाक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी घुले व पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.
















