- अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे तरुणाला जीवदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- भूमकर चौक येथील हिजवडी रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास जात असताना बाजूला असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तरुण दुचाकीसह खड्ड्यात पडला. यावेळी तेथील बांधकामाचा लोखंडी रॉड तरुणाच्या छातीत घुसला. त्यामुळे त्याला घटनास्थळाहून रुग्णालयात हलवणे कठीण झाले होते.
हिंजवडी टप्पा क्रमांक एकमधील अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तत्काळ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. अवघ्या तीन ते चार मिनिटात हायड्रोलिक कटरच्या सहाय्याने बाहेरील बाजूची लोखंडी सळई कट करून अपघातग्रस्त तरुणाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचले आहेत. बुधवार (दि. ६) रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
















