- पोलिसांकडून वाहन चोरीच्या बेंगलोर कनेक्शनचा पर्दाफाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- ‘ओएलएक्स’ वर चार चाकी वाहन विक्रीसाठी ठेऊन आरोपीने एकाला गाठले. माझ्याकडील गाडी खरेदी करणार का? असे त्या व्यक्तीला विचारले. गाडी चोरीची असल्याचा संशय त्या व्यक्तीला आला. त्यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माहिती दिली.
गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सापळा रचला अनं गाडी खरेदी करण्याची त्या व्यक्तीने तयारी दर्शविली. गाडीची प्रत्यक्ष पाहणी करायची असल्याचे त्या व्यक्तीने आरोपीला सांगितले. आरोपीने मंगळवारी (दि. १२) रोजी ताथवडे महामार्ग परिसरात गाडी पाहण्यासाठी व्यक्तीला बोलावले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
तब्बल ४४ लाख रुपयांची गाडी पोलिसांनी जप्त केली. बेंगलोरमधून या चारचाकी गाडीची आरोपीने चोरी केली होती. चेतन बसवराज म्हेत्रे (वय २६, रा. भातब्रा, ता. भालकी, जि. बिदर), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी विरोधात बेंगलोर येथील राममूर्तीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी आणि जप्त केलेली गाडी बेंगलोरच्या राममूर्तीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.