- लग्नाच्या आमिषाने महिलेची आर्थिक फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- आयटी अभियंता असणाऱ्या महिलेची टिंडर डेटिंग ॲपद्वारे एस. रवी नावाच्या प्रोफाइल धारकाशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने त्याचा व्हाटसअप नंबर महिलेला पाठविला दिला. महिलेशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे महिलेला आमिष दाखविले. आरोपीने महिलेला महागडे गिफ्ट पाठवून विश्वास संपादन केला.
महिलेला भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगून एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसरने पकडले असल्याचे त्याने महिलेला सांगितले. ती रक्कम सोडविण्यासाठी चार्जेस, दंड, जीएसटी व इतर कर भरण्याचे सांगितले. त्यासाठी विविध बँकांचे खाते नंबर देऊन महिलेकडून ७३ लाख ५९ हजार ५३० रुपये घेतले.
त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. फिर्यादी महिलेने पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्ज करून तक्रार केली. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून २०२१ ते १३ जुलै २०२१ या दरम्यान घडला. ३५ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.