एकाला अटक; दोघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- कासारवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील पानटपरी चालकाकडून बुधवारी (दि. १३) रोजी आरोपींनी २०० रुपयांच्या गायछाप तंबाखू आणि ब्रिस्टॉल सिगारेट खरेदी केल्या. फिर्यादी यांनी आरोपींना पैसे मागितले असता आरोपींनी ‘तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत’ असे म्हणत पैसे देण्यास नकार दिला. ‘मी गरीब आहे. माझे पैसे देऊन टाका’ असे फिर्यादी यांनी सांगितले असता आरोपीने गचांडी पकडून फिर्यादी यांना टपरीच्या बाहेर ओढले. इतर दोन आरोपींनी हाताने मारहाण केली.
दोघांनी कमरेचा कोयता काढून फिर्यादी यांच्या हातावर वार करून जखमी केले. फिर्यादी यांनी रस्त्याने येणा-या-जाणा-या लोकांकडे मदत मागितली असता आरोपींनी ‘तुझ्या मदतीला कोण येते तेच पाहतो. असे म्हणत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. आरोपींनी टपरी मधून ४०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. फिर्यादीने आरोपींच्या तावडीतून सुटून पळ काढला असता आरोपीनी दगड व विटांनी मारून फिर्यादी यांना दुखापत केली.
तुषार संतोष धेंडे (वय १८, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुक्तार तांबोळी (वय २३), आतिष उर्फ बंटी गावडे (वय २२), बसुराज यमनाप्पा धोतरे (वय २०, सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुक्तार तांबोळी याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत