- त्याबाबतची माहिती सार्वजनिक व्हायला हवी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार फेब्रुवारी २०२२ रोजी होत आहे. प्रभागासाठी ४० हजारांची लोकसंख्या निश्चित केली आहे. मात्र, प्रत्येक जागेनुसार म्हणजे अ , ब आणि क नुसार लोकसंख्या जाहीर करण्यात आली नाही, असे अँड. कांबिये यांनी आयुक्तांकडे नोटिशीद्वारे म्हणणे मांडले आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेच्या निवडणूक विभागाने सुरू केले आहे. एका प्रभागात सुमारे ३६ ते ४४ हजार लोकसंख्या असणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्या लोकसंख्येच्या आधारे १२८ जागांसाठी ४३ प्रभागांची रचना केली जाणार आहे.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभागातील एका जागेसाठी किती लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे, ती माहिती देण्यात आलेली नाही. ती बाब महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५ उपकलम २ (अ) एंट्री (३) तक्तामध्ये नमूद केलेल्या तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक जागेकरीता किती लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे, त्याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी. तसे केल्यास नियमाचे पालन होईल. ती माहिती जाहीर न केल्यास न्यायालयात दाद मागणार आहे. – अॅड. सतीश कांबिये…