- मनुष्यबळासह इतर प्रमुख विषयांवर चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२१) :- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी मुंबईत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक संजय वर्मा, प्रधान सचिव संजय सक्सेना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आय टी पार्क, औद्योगिकरण तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यात काही नवीन पोलीस ठाण्यांना यापूर्वीच मंजूरी देण्यात आली आहे. या नव्याने मंजूर करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक मनुष्यबळासह इमारत बांधकामांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत. शासन स्तरावर परवानगीसाठीचे प्रस्ताव तातडीने पोलिस महासंचालक कार्यालयाने आवश्यक निकषाची पूर्तता करून गृहविभागास सादर करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
अमली पदार्थ व गुन्हे शोधासाठी श्वानपथक निर्मिती, बिनतारी संदेश विभागाकरीता तांत्रिक पदे निर्माण करणे, बँडपथकाची निर्मिती तसेच अतिरिक्त पदे मंजुरी यांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाकरीता तसेच विविध पोलीस स्टेशनसाठी प्रस्तावित केलेल्या जागेबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


















