- महिला सुरक्षा, स्मार्ट सिटी भ्रष्टाचार आदी विषयांवर राष्ट्रवादीची तुफान फटकेबाजी..
- राष्ट्रवादीची फलंदाजी पाहून सत्तधारी प्रथमच आवाक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची नियोजित सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २०) ऑफलाईन पद्धतीने पार पडली. सभेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले राष्ट्रवादीचे खासदार. सभेत कसे कामकाज चालते, हे पाहण्यासाठी दुपारी सव्वा दोनला अचानकपणे प्रेक्षक गॅलरीत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवून सगळ्या नगरसेवकांचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतले. त्यामुळे विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना दाटून कंठ फुटला. महिला सुरक्षा, स्मार्ट सिटी भ्रष्टाचार, रस्ते खोदाई, आयुक्तांची कार्यपद्धती या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार टीका केली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल यांनी शहरातील विविध प्रश्नावर जोरदार हल्ला चढविला. राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्याचे भाजपच्या नगरसेवकांनीही कौतुक केले. शाब्दिक टक्केटोणपे दिले. या नगरसेवकांना उपरोधिक टोलेही लगावले.
दरम्यान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कारभारावर जोरदार टीका केली. शाब्दिक वादावादी झाली. महापालिका आयुक्त पाटील यांच्या कार्यपद्धतीवर वर्तणुकीवर टीका केली. पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत सुरुवातीला भाजप नगरसेविका सुजाता पलांडे यांनी शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील प्रत्येक प्रभागांत महिला पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी मी पाहतो, असे उत्तर दिले.
आयुक्तांच्या उत्तरावर सर्व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ” आयुक्त करतो, पाहतो, असे बेजबादारपणाचे उत्तर देतात ”, हे अशोभनीय आहे, अशी टीका भाजपच्या नगरसेवकांनी केली.
भाजप नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, स्मार्ट सिटीमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारात राजकारणी आणि अधिकारीही सहभागी आहेत. शहरातील ५०० किलोमीटर रस्त्याचे खोदकाम, ७५० किलोमीटर दाखविले आहे. २५० कोटींच्या कामाला तांत्रिक मान्यताच घेतली गेली नाही. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार एवढा स्पष्ट दिसत असताना, आयुक्त सुनावणी देत नव्हते. सुनावणीत मांडलेले मुद्दे आयुक्तांना पटले, मात्र ते त्यावर ठाम राहिले नाहीत. आयुक्त ऐकून घेत नाहीत म्हणून अडचणी निर्माण होतात. आम्ही सेटलमेंट करत नाही, आम्ही भ्रष्टाचारावर बोलतो. महापौर उषा ढोरे यांनी खुलासा करण्यास सांगितला. त्यावरूनही शाब्दिक वाद झाला.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या भाषणानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार भाषणे केली. तसेच भाजपच्या नगरसेवकांनीही भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. यावर बोलताना खासदारांना दाखविण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकांचा प्रयत्न सुरू आहे, हे ठीक आहे. पण भाजपचे नगरसेवकही कोल्हे यांच्यासमोर भाषणे करत त्यांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कानपिचक्या कलाटे यांनी दिल्या.
राजू मिसाळ यांनी स्मार्ट सिटीच्या कामावर टीका केली. विकास डोळस, माया बारणे, उषा मुंडे, राहुल जाधव, झामाबाई बारणे, मीनल यादव, वैशाली घोडेकर, आशा शेंडगे यांनीही टीका केली. दरम्यान, महापौर उषा ढोरे यांनीही आपल्या भाषणात खासदार कोल्हे यांचे कौतुक केले. हात जोडून आपण पाहतच आहात. कसं सभागृह चालते ते पहा. त्यानंतर त्यांचा सत्कार केला.