- शहरातील दुकाने रात्री ११ तर हॉटेल रात्री १२ पर्यंत सुरू राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ‘ ब्रेक द चेन ‘ अंतर्गत शहरातील सर्व व्यापारी दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत बुधवारी (दि. २०) आदेश जारी केले. शहरातील अॅम्युझमेंट पार्क, संग्रहालय व इंडस्ट्रीज हे येत्या शुक्रवारपासून (दि. २२) सुरू करण्यात येणार आहेत. तसेच फक्त मोकळ्या जागेतील कोरड्या राईड्ससाठी (ड्राय राईडस) परवानगी राहणार आहे. मात्र, पाण्यातील राईड्ससाठी सक्त मनाई असणार आहे.
राज्य सरकारने १८ तारखेला याबाबत आदेश व मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारचे आदेश, मार्गदर्शक सूचना आणि अटी शर्तींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. मात्र त्यासाठी ५० टक्के मर्यादेच्या अटीचे पालन करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.