- अनधिकृत होर्डिंग्जधारक मात्र निवांत; एकावरही फौजदारी नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जागेत उभारलेले एकूण १२८ अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज आकाशचिन्ह व परवाना विभागाने तोडून जप्त केले आहेत. कारवाईत एकही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या ‘ होर्डिंगमुक्त शहर ‘ या संकल्पनेतून शहरातील अनधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई केली जात आहे.
सर्वाधिक होर्डिंग ई क्षेत्रीय कार्यालय परिसरातील होते. जमा झालेले लोखंडी साहित्य भंगारात विकून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, एकाही होर्डिंगमालकांवर पालिकेने फौजदारी गुन्हा नोंदविलेला नसल्याने आश्चर्य होत आहे.
शहरात सुमारे ५०० होर्डिंग हे खासगी जागेत आहेत. इमारतीच्या आत व बाहेर, गच्चीवर, प्रवेशद्वार व सीमाभिंतीशेजारी अशा पद्धतीने अनेक होर्डिंग लावले गेले आहेत. त्या माध्यमातून वर्षाला लाखोंचे उत्पन्न होर्डिंगमालक मिळवित आहेत. मात्र, महापालिकेचे शुल्क भरत नाहीत. अशा होर्डिंगवर आता महापालिका कारवाई करणार आहे. त्यात होर्डिंग मालकाचे नाव स्पष्ट होत असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.