- पक्षविरोधी कारवायाचे कारण; पतीराजांचा भाजप प्रवेश नडला?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- पतीराजांचा भाजप प्रवेश पक्षप्रमुखांना रुचला नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची पक्षातून लागलीच हकालपट्टी करण्यात आली आहे, तशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले यांनीदेखील या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
‘पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे’, असे पत्रकात म्हटले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिचवडे यांच्या भाजप प्रवेशाचे पडसाद शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत महिन्यापूर्वी झालेल्या सेनेच्या भोसरी मेळाव्यात उमटले होते. तर, पिंपरी – चिंचवडचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपमध्ये चाकरी करायला दाखल झाले, त्यांना पक्षात घेऊन मी चूक केली, अशी टीका खा. श्रीरंग बारणे यांनी केली होती. ‘गजानन चिंचवडे यांना लायकी नसताना पद दिले, तरी त्यांनी गद्दारी केली. त्यांना किंमत देऊ नका. त्यामुळे ते किंवा त्यांची पत्नी निवडणुकीस उभे राहिल्यास त्यांचा पराभव झाला पाहिजे, असे आवाहनदेखील त्या सभेत पक्षाकडून करण्यात आले होते. त्यामुळे कारवाई होणार हे निश्चित होते.














