न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बोपोडी (दि. १९ जाने.) :- पुणे मनपाच्या बजेटमध्ये बोपोडीतील भुयारी मार्गसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी भाजपचे सचिव विशाल वाळुंजकर यांनी मनपा आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.
वाळुंजकर यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील दुचाकी, चारचाकी वाहने दररोज पुणे व खडकीमार्गे कामानिमित्त प्रवास करीत असतात. परिणामी बोपोडी चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. पालकमंत्री गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाहतूक कोंडीची दखल घेत, पुणे मनपा आयुक्त यांना प्रस्तावित भुयारी मार्गाचे काम करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
याबाबत मनपा आयुक्त सौरव राव यांनी सकारात्मक निर्णय घेऊन, बजेटमध्ये तशी तरतूदही केलेली आहे. परंतु, प्रशासनाकडून अद्यापपर्यंत या भुयारी मार्गाचे काम सुरु झाले नसल्यामुळे, वाहतूक कोंडी सुटण्याचे चिन्हे दिसत नसल्याचे, वाळुंजकर यांनी म्हटले आहे.











