- पालिका आयुक्तांचा ठेकेदारांना दुसऱ्यांदा दणका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ११ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पालिका आयुक्तांची ही मोठी कारवाई आहे.
शहरातील रस्त्यांवरील दुभाजक आणि चौकात रोपे व हिरवळ करून सुशोभीकरणासाठी पालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करते; मात्र शहरातील अनेक रस्त्यांवरील दुभाजक व चौकांचे सुशोभीकरण झाले नाही. अनेक ठिकाणी शोभिवंत रोपे व हिरवळ सुकली आहेत. कचरा साचला आहे. त्यामुळे शहर सौंदर्यास बाधा पोहचत आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त राजेश पाटील हे शहरात स्वतः फिरले. त्यांनी संपूर्ण शहराचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यात ही सर्व परिस्थिती समोर आली आहे.
त्यानुसार आयुक्तांनी तावरे फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, कोमल स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था मर्यादित, तुळजाभवानी सर्व्हिसेस, जी. बी. एन्टरप्रायझेस, मैत्री स्वयंरोजगार सेवा संस्था, प्रेरणा क्रिएटर्स, तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी, न्यू गार्डन गुरूज फार्म अॅण्ड नर्सरी, कल्याण स्वयंसेवी सेवा संस्था, अजित स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था मर्यादित आणि अथर्व स्वयंसेवी औद्योगिक सेवा सहकारी संस्था मर्यादित या ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. कामांत सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
रस्ते दुभाजक, चौक सुशोभीकरणाचे काम उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे करून घेतले नाही. कामांकडे दुर्लक्ष व हयगय केल्याने उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.














