- मात्र, तत्पूर्वी शासनाचे मार्गदर्शन घेतले जाईल..
- स्मार्ट सिटी भ्रष्टाचाराबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सोडले मौन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२१) :- स्मार्ट सिटीच्या विविध कामात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला असून त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे ईडी चौकशी लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या तक्रारींबाबत आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते.
पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामांबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी शासनाची मार्गदर्शन घेतले जाणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि. २२) सांगितले.
स्मार्टसिटीबाबत आलेल्या काही तक्रारींची यापूर्वी शहानिशा केलेली होती. त्यात काही अनियमितता आढळलेली नाही. सुनावणीनंतर आणखी काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. तांत्रिक मान्यता घेण्याबाबत, उपठेकेदार नेमणे, रस्ते खोदाई नियमानुसार न झाल्याबाबत नगरसेवक व राजकीय पक्षाकडून तक्रारी नव्याने प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी व आक्षेपांची सविस्तर चौकशी व प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. काही बाबतीत शासनाकडून योग्य मार्गदर्शन मागविण्यात येईल. चौकशीमध्ये कोणीही दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. निविदाप्रक्रिया संबंधितांनी राबविताना घेतलेल्या तत्कालीन भूमिकेबाबत तपासणी होईल. सल्लागारांचे कामकाजही पाहिले जाईल. सल्लागारांच्या कामकाजाबाबत सद्यः स्थिती योग्य पद्धतीने खबरदारी घेतली जात असल्याचे आयुक्त म्हणाले.