न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जाने.) :- देशाच्या आगामी राजकीय व आर्थिक वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात घोषणा होऊ शकते. सध्याच्या लोकसभेची मुदत ३ जून रोजी संपुष्टात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक किती टप्प्यात आणि कोणत्या महिन्यात होणार, यावर निवडणूक आयोगाची चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. सुरक्षा दल आणि अन्य सुविधांच्या उपलब्धतेनुसार निवडणुकीचे टप्पे ठरवले जातील. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरूणचाल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुका आटोपण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. मात्र, नुकत्याच विसर्जित झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेबद्दल अजून निर्णय होऊ शकलेला नाही.















