न्यूज पीसीएमसी नेटवर्क : पुणे : दहीहंडीसाठी जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यावर हडपसर येथे खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठीदेखील जबरदस्तीने खंडणी मागणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. व्यापाऱ्यांनी न घाबरता तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दहीहंडीच्या वर्गणीसाठी हडपसर येथे काही व्यापाऱ्यांना धमकावण्यात आले होते. तर एका तरुणाची भारती विद्यापीठ परिसरात दुचाकी पेटवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवचा सण तोंडावर आला आले. व्यापाऱ्यांकडे वर्गणी मागण्यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र फिरत आहेत. मनासारखी वर्गणी दिली नाही तर व्यापाऱ्यांना धमकावले जाते तसेच त्यांच्या दुकानाची तोडफोडही केली जाते. काही मंडळाचे कार्यकर्ते तर थेट पावतीवर मोठ्या रकमा टाकून दुकानदारांना देतात. कायमस्वरुपी परिसरात व्यवसाय करायचा असल्याने व्यापारी घाबरतच वर्गणी देतात. याचाच गैरफायदा काही कार्यकर्ते उठवत असतात. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. जबरदस्तीने वर्गणी मागणे हा खंडणीचा गुन्हा ठरु शकतो. हडपसर येथे अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने वर्गणी मागू नये असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.
जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांची माहिती व्हॉटस् अॅप क्रमांक 895283100/8975953100 या क्रमांकावर नागरिक देऊ शकतात. याची दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
















