- पाणी पुरवठ्याची कामे संथगतीने; पालिका मात्र मेहेरबान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- पाणीपुरवठा कामांसाठी डीआरए या संस्थेवर सल्लागार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. सल्लागाराला आणखी २ कोटींचा वाढीव खर्च देण्यास स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे सल्लागारावर प्रशासन मेहरबान असल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्र योजनेअंतर्गत विभागाकडून शासनाच्या पाणीपुरवठ्याचे काम संथगतीने सुरु आहे. २४ बाय ७ योजनेतून ही कामे केली जात आहेत. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी डीआरए कन्सल्टंट यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या संस्थेला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. या कामाच्या टप्पा एकसाठी ८ कोटी १२ लाख ५१ हजार, टप्पा दोनच्या कामासाठी ४ कोटी ८४ लाख ८० हजार शुल्क देण्यात आले आहेत. तर, टप्पा तीनच्या कामासाठी ८ कोटी ९१ लाख शुल्क सल्लागारास दिले आहे. एका सल्लागारावर तब्बल २१ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तरी देखील शहरात पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.
पाणीपुरवठा विभागात ९ वर्षे एकच सल्लागार आहे. त्यांच्यावर थेट पद्धतीने कोट्यवधींचा खर्च करूनही शहरात कोणताही सकारात्मक परिणाम दिसत नाही. डीआरएला आणखी २ कोटी वाढीव रक्कम देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. सर्व कामांचा व्याप लक्षात घेता हा वाढीव खर्च दिला जात आहे. दरम्यान, जेएनएन आणि अमृत योजनेअंतर्गत २४ तास, तसेच सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधींचे कामे केली जात आहेत. नवीन जलवाहिनी टाकणे, जुने नळजोड, नवीन एमडीपीई पाईपने बदलणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन टाक्या उभारणे आदी कामे शहरातील अनेक भागात सुरू आहेत. कामे संथ गतीने झाल्यामुळे संपूर्ण शहरात खोदकाम झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही संपूर्ण शहराला सुरळीतपणे पाणी मिळत नाही. असे असताना आणि काम समाधानकारक काम नसताना निव्वळ सल्लागार पोसण्याचा हेतू यामागे असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.












