सुरज करांडे :- क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. 20 जानेवारी 2026) :- चिंचवड परिसरात सायबर गुन्हेगारांनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अशोक सराफ (वय ७७, रा. चिंचवड) यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० डिसेंबर २०२५ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीला फोन करून आपण टेलिफोन विभाग, सर्वेलन्स अधिकारी व सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगितले. कॅनरा बँकेतील एका खात्याचा मनी लॉन्डरिंगशी संबंध असल्याचे खोटे कारण देत अटकेची भीती दाखवण्यात आली. तसेच बँक खाते व म्युच्युअल फंडातील रकमेची “लिगॅलिटी तपासणी” करण्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास भाग पाडले.
एकूण १ कोटी रुपये वर्ग केल्यानंतर रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बी.एन.एस. २०२३ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नाळे करीत आहेत.












