- बहुभाषिक लघुपट एकाच पडद्यावर अनुभविण्याची संधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जाने.) :- औद्योगिक शहर म्हणून नावाजलेल्या शहरात लघुपट संस्कृतीही विकसित व्हावी, या उद्देशाने ‘वाकदेवता आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. येत्या (दि. २६) रोजी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या सभागृहात दु ३.०० वा हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आयोजक ए हरिदास नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना हरिदास यांनी सांगितले की, वाकदेवता आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवासाठी आलेल्या एकूण ६७ प्रवेशिकांमधून १६ लघुपट निवडले गेलेआहेत. या लघुपटात प्रामुख्याने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम मधील लघुपटांचा समावेश आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संगीता शिवान तसेच राधाकृष्णन चक्यात, दाक्षिणात्य अभिनेत्री राधा आणि अयोकिफ्रिकॉन प्रा. लीमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गणेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणारआहे. हा कार्यक्रम विनामूल्य स्वरूपात सर्वांसाठी खुला असून रंगतदार पटांबरोबरच खास केरळी पदार्थांचाही आस्वाद घेण्याची अनोखी संधी या माध्यमातून उपस्थितांना लाभणार आहे.
यावेळी निवडलेल्या लघु चित्रपटांच्या सादरीकरणा बरोबरच सर्वोत्कृष्ट लघुपट, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, संपादन,अभिनेता, अभिनेत्री आणि बाल कलाकार यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असेल. मराठी आणि मल्याळम या प्रादेशिक भाषेतील लघुपटांना यावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही हरिदास यांनी सांगितले आहे.
आशय संपन्न लघुपटाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील विविध समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे याव्यात, या विचाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
या महोत्सवासाठी निवडलेले लघुपट :- मराठी – कन्यारत्न, हिंदी : लोन्ली कपल्स फर्स्ट किस, ९४ रुपीस की चाय, रोजमेरी, मल्ल्याळम – उरुल, उरावू, मथालनारंगा, मुन्नोरुक्कम, “ओरुकर्यम चोइकते?”, चयमुखी, एकंथम, कोक्कू, “पोन्निन्कापोक्कुना सोथ्रम”, अन्ना ‘- देअर इज़ ऑलवेज होप, थुडरम, इंग्रजी – नीलिमा – बियॉण्ड द ब्लू एन एक्सप्लोरेशन.


















