न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व सोसायटींना एकत्र आणून त्यांच्यासाठी चर्चासत्र किंवा जनता दरबार भरविण्याची मागणी, चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या विविध विकासाभिमुख योजनांमध्ये या सोसायट्यांचा मोलाचा सहभाग असतो. शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, थेरगांव, चिंचवड, भोसरी, चिखली, रावेत, पुनावळे, चऱ्होली, मोशी या परिसरात गृहनिर्माण सोसायट्यांची स्थापना झालेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक निर्णयप्रक्रियेत या सोसायट्यांना सामावून घेण्याची गरज आहे. महापालिकेचा कचरा प्रश्न या सोसायट्यांनी निकाली काढला असून, कचऱ्यापासून खतनिर्मिती करून, त्यांनी स्वयंपूर्णता सिध्द केलेली आहे. या खताचा उपयोग सोसायटी व परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी होत आहे. त्यांच्या या कामाची महापालिकेने दखल घ्यावी, आदर्श सोसायट्यांचा सन्मान करावा.
महापालिकेने सोसायट्यांना मिळकतकरात सुट देण्याची योजना आखावी. आज अनेक सोसायट्यांना पाणी समस्येशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरात कृत्रिम पाणीटंचाई करून, अनेक टेंकरचालक या नागरिकांच्या जीवावर गबरगंड झालेले आहेत. सोसायटी व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावर पथारी व हातगाडी चालकांनी अतिक्रमण करून, तेथे आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे याचा सोसायटीतील रहीवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
अशा अनेक समस्यांना येथील रहिवाशी तोंड देत असतात. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील विभागवार सोसायटी अध्यक्ष व सभासद यांना एकत्रित आणून, त्यांच्या समस्या व विकासाभिमुख मुद्द्यांवर जनता दरबार किंवा चर्चासत्रांचे आयोजन करण्याकरीता पाऊले उचलावीत, असे नवले यांनी या निवेदनात म्हटले आहे.











