न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- पूर्वीच्या शिक्षणात सुसंगती होती. आज तंत्रज्ञानाच्या जगातदेखील शिक्षणात विसंगती आढळून येत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य प्रा. शिवाजीराव दळणर यांनी चिखली येथे केले.
म्हेत्रे वस्ती चिखली येथील राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या विवेक व्याख्यानमालेत पुरातन शिक्षण आणि आजचे शिक्षण या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी प्रा. दळणर यांना शिक्षणरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार शिवाजी घोडे होते.
यावेळी उद्योजक महादेव कवितेके, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत म्हेत्रे, अजय दूधभाते, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकट वाघमोडे आदी उपस्थित होते.
प्रा दळणर पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षण कालखंडास मी पुरातन शिक्षण मानतो. पूर्वीच्या शिक्षणात मुलांमध्ये आमविश्वास निर्माण करण्याची क्षमता होती. पूर्वीच्या शिक्षणात व आजच्या शिक्षणात विसंवादाची दरी निर्माण झाली आहे. याला शिक्षकच जबाबदार आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यानी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हल्लीच्या शिक्षकांमध्ये सामाजिक जाणिवा कमी होत असल्याने संवेदनशिल राहिला नाही. आजच्या शिक्षणात संस्कारमूल्य, जाणिवा, निष्ठा दिसून येत नाही. पालक मुलांना शाळेत घालताना मातीचा गोळा म्हणून शिक्षकांकडे सुपूर्द करतात. या मातीच्या गोळ्यांना मडक्याचा आकार देण्यास शिक्षक पात्र व्हाल तेव्हा शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सुसंवाद सुरू होईल. शैक्षणिक प्रक्रिया कितीही किचकट असली तरी, अभ्यासक्रम बनविण्याचे काम शेवटी शिक्षकच करतात ना. म्हणूनच शिक्षकांना दोष देतो मी. अशा शब्दात प्रा.दळणर यांनी खंत व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषण करताना घोडे म्हणाले की, आज शाळेत जीवशास्त्र शिकवले जाते पण जीवनशास्त्र शिकवले जात नाही. केवळ मुलाना मोठ्या पगाराची नोकरी मिळावी याच हेतूने शिकवले जाते, मात्र एक चांगला नागरीक घडावा या हेतूने मुलांना पालक शिक्षण देत नाही, अशा शब्दात खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवान वाघमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना चव्हाण तर आभार सईबाई पांचाळ यांनी मानले.











