न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- लोणावळा येथील मन:शक्ती केंद्राच्यावतीने सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना ताणमुक्त अभ्यास व परीक्षा काळातील ताण कमी करण्यासाठी मेंदू शास्त्र, मानसशास्त्र आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मन:शक्ती केंद्राच्या साधक स्वाती खरुळ आणि शोभा आवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा ताणमुक्त अभ्यास व परीक्षा काळातील ताण कमी करण्यासाठी मेंदू शास्त्र, मानसशास्त्र आदी विषयांवर आधारित प्रयोग, अभ्यासाच्या सोप्या पद्धती, परीक्षा काळातील धैर्य, स्मरणशक्ती वाढविणे, त्याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी कसे प्रयत्न करावेत, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यास घेताना आपल्या पाल्याच्या अडचणी जाणून घ्या, भावनिक नाते निर्माण करा, संवाद करताना मित्र म्हणून करा. मुलांनीही दररोज आपल्या आईवडीलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले पाहिजेत. तसेच महिन्यातून एकदा शिक्षकांचेही चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले पाहिजेत. कारण शिक्षक आणि पालकांचे आशीर्वाद विद्यार्थ्यांना यशाच्या मार्गाकडे नेणारे असतात. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांचे योगदान फार महत्वाचे आहे, हे त्यांनी अनेक उदाहरणे देवून स्पष्ट केले. व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी विविध युक्त्या सांगितल्या. आपली शक्ती मोबाईल व इंटरनेटवर न घालविता आपले एक निश्चित ध्येय ठरवा, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही केले.
प्रास्ताविक व आभार मनीषा पुराणिक यांनी मानले.















