- जगात विनाकारण भीती; दक्षिण आफ्रिकन महिला डॉक्टरचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- ‘ओमिक्रॉन’या विषाणूबद्दल सर्वात आधी इशारा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन महिला डॉक्टरने या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्यास अगदी सौम्य प्रमाणामध्ये लक्षणं दिसून येत असल्याचं म्हटलंय. तसेच या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या संशयीत रुग्णांपैकी अनेकजण हे रुग्णालयामध्ये दाखल न होताच ठणठणीत बरे झाल्याचं या महिला डॉक्टरने म्हटलंय. तसेच या विषाणूबद्दल फारशी माहिती अद्याप उपलब्ध नसताना त्यासंदर्भातील वेगवेगळी माहिती पसरवली जात असल्यासंदर्भातील नाराजीही व्यक्त करण्यात आलीय.
“या विषाणूमुळे परिणाम होणार नाहीय असं आम्ही म्हणत नाही. पण ज्यांनी लस घेतली नाही त्यांनाही अगदी सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. तसेच मला विश्वास आहे की युरोपातील अनेकांना या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असेल,” असंही अँजलीक म्हणाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेबरोबर बोस्वाना आणि हाँगकाँगमध्ये या नवीन करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर ऑस्ट्रेलिया, इटली, युके, बेल्जियम आणि कॅनडामध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती समोर आलीय.
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख असणाऱ्या अँजलीक कोइ्टझी यांनी असोसिएट फ्री फ्रेसला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मागील १० दिवसांमध्ये ३० असे रुग्ण पाहिले आहेत ज्यांच्या करोना चाचणीचे निकाल सकारात्मक आलेत. पण त्यांच्यामधील लक्षणं ही वेगळी होती, असं अँजलीक सांगतात. “थकवा आल्याने हे रुग्ण दवाखान्यामध्ये आले होते,” असं अँजलीक म्हणाल्या. सामान्यपणे तरुण रुग्णामध्ये हा असा प्रकार दिसून येत नसल्याचं सांगताना त्यांनी यापैकी बरेचसे रुग्ण हे चाळीशीच्या आतील होते, अशी माहिती दिली. तसेच यापैकी अनेकांचे अर्धे लसीकरण पूर्ण झाले होते, असंही अँजलीक यांनी स्पष्ट केलं.