- प्रारूप आराखडा आयोगाला सादर होणार कि मुदतवाढ मिळणार?..
- आराखडा तयार, पालिकेचा दावा? इच्छुकांचा जीव टांगणीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीचा तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यासाठी तिसऱ्यांदा बदल केलेत. त्यामुळे आयोगाने दिलेला कालखंड अपुरा पडत असल्याचे दिसून येत आहे.
अजूनही आराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. आराखड्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली असल्याची चर्चा आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून आराखडा तयार असून त्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर तो आराखडा मंगळवारी (दि. ३०) राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार असल्याचे सांगितले जातेय.
एकूण ४६ प्रभाग असतील. त्यातील ४५ प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा राहणार आहे. कोणता प्रभाग चारचा करायचा, याचे सर्वाधिकार पालिका आयुक्तांना आहेत. नवनिर्मित एका प्रभागाची लोकसंख्या किमान ३३ हजार ५५९ ते कमाल ४२ हजार २७ असेल. सरासरी ३७ हजार २८८ लोकसंख्या राहील. प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो ३० नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश निवडणूक विभागाने महापालिकेस ३ नोव्हेंबरला दिले होते. पालिकेच्या २५ पथकामार्फत प्रभागरचनेचे काम केले जात आहे.
आयुक्त पाटील यांच्या स्वाक्षरीनंतर त्यास अंतिम स्वरूप येणार आहे. त्यानंतर तो आराखडा पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून तो सील करून मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाकडे मंगळवारी पाठविला जाणार आहे. दरम्यान आयोगाने प्रारूप आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर त्यावर हरकती व सूचना सुनावणी होईल. त्यानंतर आयोगाने अंतिम आराखड्यास मान्यता दिल्यानंतर जाहीरपणे सर्वासमोर आरक्षणाच्या सोडती काढल्या जातील. दरम्यान, नवी प्रभागरचना कशी असणार, त्यात कोणता नवा भाग समाविष्ट केला आहे, वस्ती, झोपडपट्टी, चाळ, हाउसिंग सोसायटी असा कोणता भाग वगळला याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.