- आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याची आवश्यकता – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात बाहेरच्या देशातून आलेल्या प्रवाश्यांमध्ये ऑमिक्रॉन कोरोनाची लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. ह्याचाच अर्थ ऑमिक्रॉन ने उंबरठा ओलांडून आपल्या शहराच्या हद्दीत प्रवेश केला आहे. आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाश्यांनमध्ये विशेषतः त्याची लक्षणे दिसून आलेली आहेत. त्यामुळे शहराच्या आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याची आवशकता आहे, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वस्तू प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत. अश्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने पुन्हा लॉकडाऊन होऊ नये ह्यासाठी आताच प्रारंभिक दक्षता घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊन मुळे शहराच्या आर्थिक चक्राला अगोदरच खिळ बसलेली आहे. त्यातच पुन्हा ऑमिक्रॉंनचा प्रवेश धोक्याची घंटा आहे. शहराच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षा हेतू कडक नियम लागू करणे आवश्यक आहे. या अगोदरच्या कोरोनाच्या दोन लाटांमध्ये शहराचे अतोनात नुकसान झालेले आहे. अजूनही शहर कोरोनामुक्त झालेले नाही. त्यातच ऑमिक्रॉनचा प्रवेश गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
निवडणुकीच्या तोंडावर गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते अश्या कार्यक्रमावर निर्बंध आणणे खूप गरजेचे आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने कोरोना काळात नागरिकांच्या मदत हेतू प्रबोधन करण्याचे कार्य सुरू असून यापुढेही प्रशासनास समितीचे सहकार्य असणार आहे.
















