- महापालिका आयुक्तांचा निर्णय; स्थायीपुढे प्रस्ताव सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२१) :- सलग दुसऱ्या वर्षी मिळकत करात कोणतीही करवाढ पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने सुचविलेली नाही. करविषयक प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. मिळकत करात कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे.
महापालिका प्रशासनाकडून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता २० फेब्रुवारीपर्यंत मिळकत करांचे उद्दिष्ट ठरविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महापालिका अधिनियममधील कलम ९९ अन्वये आर्थिक वर्षासाठी करांचे दर जैसे थे ठेवले आहेत. प्रशासनाने यंदा कराचे दर निश्चित करण्याचा विषय तीन महिने अगोदर मांडला आहे. तसेच , साफसफाई अग्निशामक कर, शिक्षण कर, वृक्ष कर, मलप्रवाह कर सुविधा, पाणीपुरवठा, रस्ता कर जैसे थे ठेवले आहेत. करमणूक करातही कोणतीही वाढ केली नाही. निवासेतर करशुल्कही ‘ जैसे थे ठेवले आहेत. सामान्य करातील सवलत योजना कायम ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडे सध्या ५ लाख ६१ हजार मालमत्तांची नोंदणी आहे. त्यात व्यावसायिक, निवासी, संमिश्र मालमत्ता आहेत. करयोग्य मूल्याच्या टप्यानुसार निवासी मालमत्तांसाठी १ ते १२ हजार रुपयांपर्यंत १३ टक्के, तीस हजार आणि त्यापुढील मूल्यासाठी २४ टक्के असे सध्याचे दर आहेत. हेच दर आगामी आर्थिक वर्षात कायम आहेत. १ एप्रिलपासून करण्यात येणार अंमलबजावणीत मालमत्ता उतारा, हस्तांतरण नोटीस, प्रशासकीय सेवा, थकबाकी नसल्याचा दाखला देणे यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आहे तसेच राहणार आहे. स्थायी समितीच्या बुधवारी होणाऱ्या साप्ताहिक सभेसमोर आयुक्तांनी आगामी आर्थिक वर्षामध्ये सामान्य कर कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. स्थायी समितीच्या निर्णयानंतर सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाईल. एप्रिल महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
















