- अनेकांनी अनुभवली गुरु, शनी, शुक्र आणि चंद्राची खगोलीय स्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- पश्चिम क्षितिजावर आकाशामध्ये गुरु, शनी, शुक्र आणि चंद्र हे एका रेषेत येणार होते. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी आकाशदर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
सायन्स पार्कतर्फे (बुधवारी) सायंकाळी ६ ते ८ यावेळेत सायन्स पार्क येथे आकाश दर्शनचा कार्यक्रम आयोजिण्यात करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ५०० खगोलप्रेमी उपस्थित होते. मात्र, क्षमतेअभावी ३०० नागरिकांना प्रवेश मिळाला नाही. त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यवस्था करण्यात आली आहे.
पार्क नेहमीच खगोलप्रेमींसाठी खगोल विश्वातील घडणाऱ्या घटनांची माहिती देत असतो. पश्चिम क्षितिजावर आकाशामध्ये गुरु, शनी, शुक्र आणि चंद्र हे एका रेषेत आणि स्पष्टपणे दिसले. आकाशदर्शना दरम्यान प्रेक्षकांना गुरु व त्याचे उपग्रह, शुक्र आणि चंद्राचे मनमोहक आणि ठळक रूप स्पष्ट पाहता आले. चंद्रावरील विवर आणि गुरूचे मनमोहक रूप पाहून विद्यार्थी, पालक हरखून गेले होते. यावेळी सायन्स पार्कचे सुनील पोटे यांनी आकाश दर्शनाविषयी उपस्थितांना माहिती दिली.