- संबंधित विभागांना शिस्तीचे धडे गिरविण्याचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेत वेळेवर कामावर न येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आयुक्तांनी शिस्त लावण्यासाठी पाऊल उचलले आहे. महापालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन शिस्तीचे पालन करीत नाहीत. त्यांनी शिस्तीचे पालन करावे, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
आदेशात म्हटले आहे की, कार्यालयाने नेमून दिलेल्या वेळेत नियमित उपस्थित राहावे. थम्ब, फेस लिडिंग इम्प्रेशन करून हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करावी. नियंत्रित अधिकाऱ्यांनी हजेरी पत्रकाची दैनंदिन तपासणी करताना करावी. महापालिका कार्यालयात प्रवेश उपस्थित असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. पदानुसार विहित केलेला गणवेश परिधान करावा. गणवेश परिधान करीत नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.
ज्या अधिकारी, कर्मचाऱ्याने एका महिन्यात ३ किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस थम्ब इम्प्रेशन उशिराने केलेले असल्यास त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३ लेटकरिता एक किरकोळ रजा खर्ची टाकण्याची कारवाई करावी. कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून अधिकारी, कर्मचारी इतस्त्र फिरत असल्यास, दुपारी भोजनाच्या सुटीनंतर वेळेवर जागेवर उपस्थित राहत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. फिरती रजिस्टर विहित नमुन्यात ठेवून त्यामध्ये फिरतीच्या ठिकाणी, कामाचे स्वरूप, बाहेर जाण्याची वेळ व कार्यालयात आल्यानंतर परत आल्याची वेळ नियमितपणे नमूद करावी. नियंत्रित अधिकाऱ्यांनी फिरत्या रजिस्टरची वेळोवेळी तपासणी करून स्वाक्षरी करावी. तपासणी पथकाने नियमितपणे विभागांची तपासणी करावी. तपासणीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रजा खतावणी रजिस्टर प्रामुख्याने तपासावे, असे आदेशात म्हटले आहे .