- स्टेडीअमधील पायाभूत सुविधांमध्ये पालिकेचे क्रीडा प्रशासन मात्र, नापास…
- पाणी, स्वच्छतागृहाची अर्व्यधवट व्यवस्था स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- ‘अकरावी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१’ आजपासून सुरू होणार आहे. नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिचवड महानगरपालिका महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुक्रवारी मैदानाची पाहणी केली.
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार, हॉकी महाराष्ट्राचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी ३ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. हॉकी प्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे. देशातील विविध ३० राज्यातील ७५० खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असून, ४० पंच, ८ सिलेक्टर, १० पदाधिकारी, १० स्वयंसेवक स्पर्धेचे कामकाज पाहणार आहेत. एकूण ५० सामने होणार असून, दररोज सात सामने खेळवले जाणार आहेत. १८ डिसेंबर रोजी क्वार्टर फायनल तर, २१ डिसेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होईल. या स्पर्धेत तीस राज्यातून साडेसातशे खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी महानगरपालिकेने स्थापत्य विषयक कामाकरिता २ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले आहेत. पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत, स्टेडियममध्ये पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याची बाब समोर आली. वॉशबेसिनची सुविधा नाही. येथील कर्मचाऱ्यांना तुम्ही कोणते स्वच्छतागृह वापरता असा प्रश्न विचारला असता ‘आम्ही स्टेडियमच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावरील स्वच्छतागृहाचा वापर करतो’ असे उत्तर त्यांनी दिले. स्पर्धेला जवळपास दहा हजार क्रीडा प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. हे सर्व खेळाडू व प्रेक्षक स्टेडियममधील पायाभूत सुविधांचा वापर करणे अपेक्षित आहे. स्मार्ट शहरातील स्टेडियममध्ये स्मार्ट पायाभूत सुविधा नाहीत. ही शहरातील सुमारे ३० लाख नागरिकांसाठी लाजिरवाणी बाब आहे. ही ‘राष्ट्रीय स्पर्धा आहे की गल्लीबोळातील लहान मुलांची स्पर्धा’ हा निष्कर्ष पत्रकारांनी यावरून काढला. क्रीडा स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे यांचे नियोजनच फसल्याचे पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे सिद्ध झाले आहे. महापालिकेची मान परराज्यातील येणाऱ्या खेळाडूं समोर झुकणार, हे निश्चित.
दरम्यान नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास मैदान येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी देशातून येणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंसाठी स्टेडियम परिसरात मूलभूत सुविधा का नाहीत? असा प्रश्न विचारला असता निरुत्तर आयुक्तांसह महापौर व इतर पदाधिकाऱ्यांवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली.












