- पालिका निवडणुकांना शिवसेनेबरोबर कॉंग्रेसशिवाय राष्ट्रवादी सामोरे जाणार…
- पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात स्थानिक पदाधिकाऱ्यांनादेखील अजित पवारांच्या कानपिचक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याची मानसिकता दर्शविली आहे. मात्र, आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले आहे. कोणाचे किती बळ आहे. याचा पंचनामा करायला नको. मात्र, आपल्या सध्याच्या ताकदीनुसार जागा वाटप झाल्यास आम्हाला काहीच अडचण नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाआघाडीबाबत सुतोवाच केले. ज्या वेळी मित्रपक्ष समन्वयाची भूमिका घेतात तेव्हा आपणही दोन पावले पुढे मागे व्हायचे असते. असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपण कॉंग्रेसला लगावला.
पिंपळे गुरव येथील निळू फुल नाटयगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवार (दि. १०) समारोप झाला. कार्यकर्त्यांना मागदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
पवार म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच सांगितले की, आम्ही स्वबळावर लढणार आहे. कोणामध्ये किती बळ आहे, हे सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाचे बळ अधिक आहे, असे समजू, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या ताठर भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली. कार्यकर्त्यांची शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता दिसत आहे. हे वृत्तपत्रात वाचले. आपले मित्र समन्वयाची भूमिका घेतात. तशी मानसिकता ठेवतात. त्याप्रमाणे आपणही सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. सर्वांचे पहिले ध्येय महापालिकेतील भाजपला पराभूत करणे हे आहे. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. येणारी परिस्थिती व पक्षाची ताकद पाहून निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात इतर पक्षासोबतच्या व्यक्तींशी मित्रत्वाचे संबंध असतात. परंतु, ते संबंध कुठपर्यंत असावेत त्याचे आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपली भूमिका अधिक आक्रमकपणे लोकांसमोर मांडू, त्यावेळेस जननेला ते समजते, असे अजित पवार म्हणाले. मला माहीत आहे कोणाचे काय चालले आहे, कोण मॅच फिक्सिंग करते. ते सर्व मला माहित आहे. सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. माझेही विरोधकांशी संबंध चांगले होते. परंतु, मी कधीही कोणाशी फिक्सिंग केली नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे मनापासून काम करायचे. त्याला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावायची. तू मला या वॉर्डात मदत कर, मी तुला तुझ्या वॉर्डात मदत करतो, असले येथील प्रकार बंद करा. त्याचा फटका काम करणाऱ्या कार्यकत्यांना बसतो. घरभेदी असेल तर काहीही होत नाही, अशा विविध सूचना करीत पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली.
आंध्रा व भामा आसखेड धरणाचे पाणी शहरासाठी मंजूर केले. पण, भाजपला ते पुढे नेता आले नाही. अशी टीका करताना पवार म्हणाले की, शहराचा चहुबाजूने विकास होत आहे. वाढते नागरीकरण व लोकसंख्या वाढीचा दर पाहता एकटया पवना धरणाचे पाणी शहराला पुरणार नाही, हे माहित असतानाही सत्ताधाऱ्यांनी नियोजन न करता दिवसाआड पाणी पुरवठा नागरिकांच्या माथ्यावर हाणला आहे. भाजपची केंद्र राज्य व पालिकेत सत्ता होती. पालिकेत आताही आहे. पण, भाजपने अनधिकृत बांधकामाचा, शास्तीकराचा प्रश्न निकाली काढला नाही. केवळ मते मिळविण्यासाठी लोकांना भूलथापा दिल्या. हे नागरिकांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पेव्हिंग ब्लॉक, रस्त्याशिवाय काहीच कामे झाली नाहीत. केवळ फ्लेक्सवर ‘ नमामि इंद्रायणी ‘ म्हणून नदी पात्रातील जलपर्णी निघत नाही. शहर खड्डेमय झाले आहे. नियोजन नाही. सुनियोजित विकास केला नाही. आमच्या काळातील बेस्ट सिटी पाहिजे की आताची स्मार्ट सिटी पाहिजे हे लोकांना विचारले पाहिजे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शहरातील नागरिकांनी पक्षाला ताकद दिली. पक्षाची सत्ता असताना सर्वांना विश्वासात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास केला. शहर अत्यंत नियोजनबद्धपणे वसविले आहे. वेळप्रसंगी वाईटपणा घेऊन रस्ते प्रशस्त केले. उड्डाणपूल, सब – वे, स्टेडिमय केले. देश, जगाच्या पातळीवर शहराचे नाव पोहोचविले. मात्र, सन २०१७ मध्ये भाजपच्या खोट्या – भूलथापांना बळी पडून नागरिकांनी भाजपकडे पालिकेची सूत्रे दिली. तेव्हापासून शहर विकासात मागे पडले आहे. लाचखोरी प्रकरणामुळे शहराची बदनामी झाली.












