- मोकळ्या जागांना सिमाभिंत घालून बंदिस्त करा..
- महापौर माई ढोरे यांचे पालकमंत्री अजित पवारांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- सागंवी येथील जलसंपदा विभागाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होत असून अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी त्या मोकळ्या जागांना सिमाभिंत घालून बंदिस्त करावे, अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पालकमंत्र्यांनी त्याबाबत संबंधित अधिका-यांना निर्देश देऊन तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.
विधानभवन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभेच्या उपसभापती निलम गो-हे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे असेही महापौर माई ढोरे यांनी यावेळी सांगितले. जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने समन्वय साधून कामे पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असल्याचेही त्या म्हणाल्या.












