- दहा कोटींपेक्षा अधिकचा महसूल शासकीय तिजोरीत जमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण २ हजार २३७ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. त्यामध्ये १० कोटींपेक्षा अधिकचा महसूल जमा झाला आहे.
पिंपरी – मोरवाडी न्यायालयात २३२ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये १ कोटी ५४ लाख ६६ हजार ७७ रुपये इतका महसूल जमा झाला. आकुर्डी येथील न्यायालयात येथे २००५ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ९ कोटी ८ लाख ११ हजार ६६६ रुपये इतका महसूल जमा झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ वकील अॅड. सुभाष चिंचवडे होते. न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश डी. आर. पठाण यांच्यासह न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. आर. काळे, पी. सी. फटाले, एन. टी. भोसले, आकुर्डी न्यायालयाचे न्यायाधीश कुलकर्णी, पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख न्यायाधीश पठाण यांनी नागरिकांना लोकअदालत व त्याचे महत्त्व सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. सुनील कडूसकर, अॅड. सुदाम साने, अॅड. दिनकर बारणे, पिंपरी – खेड – मावळ नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अतीश लांडगे आदी उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे, उपाध्यक्ष गौरव वाळुंज, सचिव अॅड. निखिल बोडके व इतर जणांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अॅड. बोडके यांनी सूत्रसंचालन तर, अॅड. सुरवसे यांनी आभार मानले.