- बंदुकीच्या धाकाने दुचाकीही पळविली; सकाळी साडेदहाच्या दरम्यानची घटना..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२१) :- सांगवीतील काटेपुरम चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास एकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या योगेश जगताप यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना दोन गोळ्या लागल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
काटे पुरम चौकात असताना अचानक त्यांच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. ते पाहून जगताप पळत सुटले, त्यांच्यात झटापट झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आरोपीने जगताप यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या असून पैकी दोन त्यांना लागल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा चौक नेहमी गजबजलेला असतो. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. ही माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप गोळीबाराचे कारण समजू शकलेले नाही.
















