न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२१) :- पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून मोरवाडीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता या पुलावरून तूर्तास दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.
पिंपरी येथील उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याचे काम महापालिका प्रशासनाने दीड वर्षांपूर्वी हाती घेतले. सुरुवातीला गोकुळ हॉटेलकडून उड्डाणपुलावर जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर पिंपरी उड्डाणपुलावरून मोरवाडीकडे जाणाऱ्या पुलावरील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. किरकोळ कामे वगळता येथील कामे अपूर्ण आहेत. तथापि, वाहतुकीसाठी येथील रस्ता खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.
दरम्यान, पिंपरी उड्डाणपुलावरून शगुन चौक (पिंपरी) आणि पिंपरी – चिंचवड लिंक रस्ता अशा दोन दिशांना जाणाऱ्या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. त्यासाठी पिंपरी वाहतूक विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून कामासाठी प्रथम परवानगी मिळाल्यावर तेथील काम केले जाणार आहे. पिंपरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या संपूर्ण कामासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.
















